Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

'दादा' माणूस

जन्माष्ठमीला मुंबईतील लालबाग भागात अगदी साधारण वस्तीत दादांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना कृष्णा या नावाने हाक मारली जायची. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे आजूबाजूचं वातावरणही परिस्थितीला साजेल असेच होते. भांडणं, हाणामार्‍या या नित्याच्या होत्या. दादा सांगतात, ''मला लहानपणी सगळे घाबरायचे. कारण मी भांडायला, हाणामारी करायला अजिबात घाबरायचो नाही. आमच्या वस्तीतल्या कुणा मुलीची छेड काढली तर मग त्याच्यावर सोडावॉटरच्या बाटल्या, आणि दगडविटांचा मारा ठरलेला असायचा.''

दादांना संगीताच कान लहानपणापासूनच होता. त्यांच्या चित्रपटांची गाणी हीट ठरण्याचं कारण तेही एक होतं. या गीताच्या वेडापोटीच ते एका एका बॅंड पथकातही सामील झाले होते, असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. म्हणूनच त्यांना बॅंडवाले दादा असंही लोक म्हणून लागले. पुढे दादा हेच त्यांचं नाव पडलं.

ज्येष्ठ साहित्यिक वसंत सबनीस यांनी त्यावेळी 'छपरी पलंगाचा वग' नावाचं वगनाट्य लिहिलं होतं. पुढे त्याचंच नाव 'विच्छा माझी पुरी करा' असं झालं. या नाटकातून दादांना पहिली संधी मिळाली. दादांचा विनोदाचा 'सेन्स' आणि संवादफेकीतील वेगळेपण यामुळे सगळ्यांचच लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. हे वगनाट्य तुफान गाजलं. आणि त्याबरोबर दादाही. या वगनाट्याच्या पंधराशेहून अधिक प्रयोगात दादांनी काम केलं.

दादांना चित्रपटात संधी दिली ती भालजी पेंढारकरांनी. 'तांबडी माती' हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांच्यावर चित्रीत केलेलं गाणंही चांगलंच गाजलं आहे. त्यानंतर मग दादांनी सोंगाड्याची निर्मिती केली. या पहिल्याच चित्रपटाने दादांना यश दाखवलं. मग त्यांना मागे वळून पहावंच लागलं नाही. एकामागोमाग एक यशस्वी चित्रपटांची मालिकाच त्यांनी दिली. एकेकाळी अपना बाजार या व्यावसायिक दुकानांच्या साखळीत साठ रूपये महिना या पगारावर काम करणार्‍या या 'घाटी' व्यक्तीवर लोकांनी अमाप प्रेमाची उधळण केली. चाळीतल्या एका छोट्या खोलीतून मुंबईतील शिवाजी पार्क या अत्यंत महागड्या नि पॉश भागात एका अपार्टमेंटचा मालक नि करोडपती बनवलं.

दादा लोककला कलावंत होते. त्यामुळे तमाशा, नाटक हे फॉर्म त्यांच्या आवडीचे होते. सामान्य माणसांची आवडही तीच होती. दादांनी तीच नस ओळखून आपल्या चित्रपटातही हा 'माणूस'च केंद्रीभूत ठेवला. त्याच्या मनोरंजनावरच त्यांनी भर दिला. ते नेहमी म्हणत, ''माझा चित्रपट मिल कामगारांसाठी, शेतकर्‍यांसाठी आणि रस्त्यावरच्या माणसांसाठी आहे. माझा चित्रपट समाजातील उच्च वर्गासाठी नाही. या वर्गातील लोकांना माझा चित्रपट आवडला तरी ते एकदाच पहातील. पण एखाद्या कामगाराने हा चित्रपट एकदा पाहिला तरी तो तीन तीन वेळा पाहील. आणि अतिशय आनंद घेऊन तो चित्रपट बघेल. ''

(सुरेश चिपळूणकर यांच्या मूळ हिंदी लेखातील काही भागाचा अनुवाद..)

प्रतिसाद

Re: दादा माणूस
mastach aahe
नकार