बिहारमध्ये आलेल्या महापुराने कहर केला असून जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले आहे. पंतप्रधानांनी अखेर या पुरामुळे बिहारमध्ये 'राष्ट्रीय आपत्ती' घोषित केली आहे. पण यासार्या प्रकोपासाठी कारणीभूत ठरली ती कोसी नदी. बिहारचे अश्रू ही आपली ओळख या नदीने सार्थ केली आहे. दरवर्षी या नदीला येणार्या पुराचे दूरगामी परिणाम होत आहेत. त्याचा संबंध महाराष्ट्राशीही आहे. कसा ते पाहू.
कोसीचा उगम हिमालयात होतो. नेपाळमधून ती बिहारमध्ये प्रवेश करते. येताना ती आपल्याबरोबर बरीच वाळूही आणते. त्यामुळे बिहारमध्ये शेतकरी हैराण झाले आहेत. या वाळूमुळे जमिनीची नापिकी वाढली आहे. महर्षी विश्वामित्राचा संबंध या नदीशी जोडला जातो. महाभारतात कौशिकी म्हणून जिचा उल्लेख सापडतो, ती हिच नदी.
या नदीला सप्तकोसी असेही संबोधले जाते. कारण हिमालयातून निघालेल्या कोसीत सात नद्या येऊन मिसळतात. सन कोसी, तमा कोसी, दूध कोसी, इंद्रावती, लिखू, अरूण व तमार अशी या नद्यांची नावे आहेत. या सगळ्यांच्या संगमामुळेच तिला सप्तकोसी म्हणतात. कोसीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा प्रवाह कधीही बदलू शकतो. त्यामुळेच लोकांची दाणादाण उडते. सध्या झालेल्या प्रकोपाचे कारणही तिचा प्रवाह बदलणे हेच आहे. गेल्या दोनशे वर्षांत कोसीने पूर्वेकडून पश्चिमेकडे १२० किलोमीटर प्रवाह सरकवला आहे.
त्यामुळे प्रत्येक वर्षी एक नवा भाग कोसी गिळंकृत करत जाते. बिहारमधील पूर्णिया, अररिया, मधेपुरा, सहसरा, कटिहार या जिल्ह्यांत कोसीच्या अनेक शाखा आहेत. कोसी बिहारमध्ये महानंद व गंगेला मिळते. त्यामुळेसुद्धा पाण्याचा फुगवटा वाढतो.
बिहारमधील पूर्णिया व कटिहार हे जिल्हे कोसीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे. एकीकडे प्रलय माजविणार्या या नदीचे दुसरीकडे मात्र गुणगाणही गायले जाते. बिहारमधल्याच मिथिलांचल भागात या नदीशी संबंधित लोककथा, लोकगीते आहेत.
पूर येण्याची कारणे
हिमालयातून होणार्या भुस्खलनामुळे तसेच जमिनीचा वरचा थर सरकला जाण्यामुळे कोसीला दरवर्षी पूर येतो. खूप उंचावरून ही नदी येत असल्याने पावसाळ्यात तिच्या पाण्याचा प्रवाह नेहमीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी जास्त असतो. जमिनीचा वरचा थरच ती आपल्याबरोबर घेऊन येते. मैदाना प्रदेशात आल्यानंतर तिच्या प्रवाहाची गती कमी होते. पण तिला सामावून घेण्यासाठी नदीचे पात्र अपुरे पडत असल्याने तिचे पाणी सगळीकडे फैलावते. त्यातच पाऊस सुरू असल्यास नदी आजूबाजूचा प्रदेश गिळंकृत करत सुटते.
बांधावरून वाद
नेपाळ व भारत सरकारदरम्यान झालेल्या करारानुसार या नदीवर अकरा बंधारे बांधण्यात आले आहेत. तरीही ते कोसीचे पाणी रोखण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. त्याचवेळी बांधाच्या प्रश्नावरून नेपाळ व भारत दोन्ही देशात नेहमी वाद उत्पन्न होत असतो. त्याचवेळी पर्यावरणवादीही या बांधांना विरोध करत आहेत. हा संपूर्ण परिसर भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने तेथे पाण्याचा साठा जास्त झाल्यास भूकंपाची शक्यता आहे, अशी शक्यता ते व्यक्त करत आहेत. भूकंपामुळे बांध फुटल्यास बिहारचे मधुबनी, पूर्णिया, दरभंगा, सहरसा हे जिल्हे पाण्याखाली जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी या विरोधाला राजकीय कारणेही आहेत. नेपाळमध्ये आता माओवाद्यांचे सरकार आहे. भारतातील नक्षलवाद्यांना तेच मदत करतात. त्यांनी भारताला लक्ष्य करण्यासाठी हे बांध फोडले तर बिहारमध्ये हाहाकार माजेल.
पुराचे परिणाम
बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून येणार्या पुराने शेतजमिनीची नासाडी केली आहे. जमीन सुपीक असली तरी दरवर्षी पुरासोबत येणारी वाळू शेतात पसरली गेली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र नापिक झाले आहे. त्यावर पीक घेणेही शक्य नाही. त्यामुळे शेती करणे तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे बेरोजगार बिहारी तरूण नोकरीसाठी इतरत्र जात आहे. मुंबई व महाराष्ट्रात बिहारींची संख्या वाढण्याला हेही एक कारण आहे.

लोड होत आहे...