मुख्यमंत्रिपद ही नारायण राणेंची कायमच महत्त्वाकांक्षा होती. शिवसेनेत असतानाही आणि सोडल्यानंतरही. किंबहूना त्याच अटीवर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. पण कॉंग्रेसी संस्कृती त्यांना कधी समजलीच नाही. कॉंग्रेसमध्ये पदांसाठी पात्रता असायला हवी असे नाही, पण निष्ठा मात्र लागतेच. राणेंच्या मते त्यांच्याकडे पात्रता होती, पण निष्ठा नव्हती. म्हणूनच मुख्यमंत्रिपदासाठी सुरवातीला त्यांचे नावच नव्हते आणि पुढे आले तेही त्यांच्या दबावामुळे. पण कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा कौल चव्हाणांकडेच होता. फक्त राणे दुखावू नये अशी त्यांची इच्छा होती. पण हा डाव राणेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या आक्रमक स्वभावानुसार ते उसळले आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. थेट नेतृत्वावर अशी टीका कॉंग्रेस सोडताना आजपर्यंत कुणी केली नसेल. या सगळ्यांची बीजे राणेंच्या कॉंग्रेस प्रवेशातच होती.
कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून राणेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. किंबहूना त्याच अटीवर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण कॉंग्रेस जे बोलते ते करतेच असे नाही, हे शिवसेनेच्या 'रोखठोक' संस्कृतीतून आलेल्या राणेंना कळले नाही. सहाजिकच अस्वस्थ झालेल्या राणेंची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर होऊ लागली. त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लक्ष्य करण्याचा.
विलासरावांवर त्यांनी अनेकदा जाहीर टीका केली. गेल्या वर्षी तर राणेंनी थेट हायकमांडच्याच गल्लीत जाऊन विलासरावांविरूद्ध नाकर्तेपणाचा आरोप करून दिल्लीच्या थंडीतही गर्मी आणली होती. हे प्रयत्न विफल झाल्यानंतर मग राणेंनी राज्यात जाऊन थेट विलासरावांविरूद्ध सभा घेण्याचा सिलसिलाच चालवला. नगरच्या सभेत तर त्यांनी थेट पंतप्रधानांविरूद्ध प्रहार केला. पण तरीही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली नाही. पण कदाचित यामुळेच मुख्यमंत्री बदलाच्या वेळी त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. शिवाय राणेंच्या विरोधात विलासरावांनी फिल्डिंगही लावली होती. एरवी विरोधात असलेले चव्हाण- देशमुख राणेविरोधाच्या मुद्यावर एकत्र आले होते. त्यांच्यामुळेच राणेंची मुख्यमंत्रीपदाची 'बस' चुकली.
सहाजिकच राणेंनी याचे खापर कॉंग्रेसच्या संस्कृतीवर फोडले. विलासरावांवरही टीका केली. अशोक चव्हाणांची लायकीही काढली. आणि हे सांगता सांगता माझ्याकडे ४० - ५० आमदार आहेत हे सांगत बंडखोरीची धमकीही दिली. पक्ष सोडणार असे थेट संकेतही दिले. या पार्श्वभूमीवर ते कॉंग्रेसमध्ये रहाणार नाहीत, हे स्पष्ट आहे. शिवाय एवढ्या आक्रमक पवित्र्यानंतर कॉंग्रेसही त्यांना पक्षात ठेवेल असेही नाही. पण मग आता राणेंचे पुढे काय होणार?
राणेंपुढे फारच मर्यादीत पर्याय आहेत. शिवसेना सोडल्यानंतर त्यांना भाजपचा रस्ताही बंद झाला होता. कारण राणेंना घेऊन भाजप शिवसेनेला दुखावू इच्छित नाही. भलेही राणे गोपीनाथ मुंडेंचे मित्र असतील. पण पक्षीय पातळीवर ही मैत्री परवडणारी नाही. त्यामुळे भाजपचा दरवाजा राणेंसाठी तेव्हाही आणि आताही बंद आहे.
राणेंचा हा आक्रमकपणा पाहिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांना आपल्याकडे घेईल असे वाटत नाही. मुळात राष्ट्रवादीकडे नेते एवढे आहेत की त्यांची सोय लावायला पदे नाहीत. त्यात राणेंना घेऊन सत्तास्पर्धा वाढविण्याची राष्ट्रवादीची तयारी नाही. शिवाय राणेंचा उपयोग ते आपल्याकडे नसतानाच आहे हे पवार ओळखून आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन पवार स्वतःला त्रास करून घेणार नाहीत.
राणे शिवसेनेत परत जाण्याची शक्यताही नाही. शिवाय थेट बाळासाहेबांवर टीका करणार्या राणेंना शिवसेनाच घेणार नाही. तसेच आताही राणेंचा पत्ता कापण्यात शिवसेनेचाही वाटा होताच. अशा परिस्थितीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांच्यासाठी पर्याय ठरू शकतो. राज यांनीही राणेंसारखीच शिवसेना सोडली आहे. दोघांचेही दुःख एकच आहे. शिवाय दोघांचे संबंधही बरे आहेत. दोघांनीही एकमेकांवर तीव्र टीका केलेली नाही. उलट उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनात राणेंनी राज यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन पक्षश्रेष्ठींच्या भुवया उंचावायला लावल्या होत्या. मराठी माणूस या मुद्यावर राणेही आक्रमक आहेत. पण राज त्यांना पक्षात घ्यायला कितपत उत्सुक असतील हा प्रश्न आहे. राणे हा निखारा हातात घ्यायचा तर हात पोळून घ्यावे लागतात. शिवसेनेत असताना बाळासाहेब असल्याने त्यांना ते शक्य झाले. राज यांना ते शक्य होईल काय? हा प्रश्न आहे.
राहता राहिले तर राणे स्वतंत्र पक्ष काढू शकतात. त्यांची 'स्वाभीमान' नावाची संघटनाही आहे. त्याचा उपयोग त्यांना पक्ष स्थापनेसाठी होऊ शकतो. पण एकूण विचार केला तर त्यांना कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता आहे. राणे हे राज्यव्यापी असले तरी त्यांना जनाधार कितपत मिळेल ही शंका आहे. मुळात आहे त्या पक्षांत आपला पक्ष वेगळा आहे हे त्यांना कसे पटवून देता येईल हा प्रश्न आहे. शिवाय राजकारणात 'श्रद्धा' आणि 'सबुरी' महत्त्वाची असते. राणेंकडे तीच नाही. त्यामुळे पक्ष काढल्यानंतरही तो टिकवून ठेवणे सत्तेपर्यंत आणणे त्यांना कितपत शक्य होईल याबाबत साशंकता आहे. राणेंना मुख्यमंत्रिपदाचीच आकांक्षा असल्याने नवा पक्ष काढल्यास तो स्वबळावर सत्तेपर्यंत येईपावेतो वाट पाहायची त्यांची तयारी आहे, असे वाटत नाही.
मनसेचा आणि स्वतंत्र पक्ष स्थापनेचा पर्याय सोडल्यास राणेंपुढे सध्या तरी एकच पर्याय दिसतो आहे, तो म्हणजे कॉंग्रेसशी जुळवून घेणे. पण कॉंग्रेसवर एवढी तीव्र टिका केल्यानंतर ते माघार घेतील काय याबाबत शंकाच आहे. शिवाय कॉंग्रेसनेही त्यांना माफ केल्यास नवा पायंडा पडेल. त्यामुळे राणेंचे पुढे काय होणार हा प्रश्न सध्याच्या घडीला अतीव उत्सुकतेचा आहे हे नक्की.
लोड होत आहे...