Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

ना'पाक' हल्ला

पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमध्ये आज श्रीलंकेच्या खेळाडूंना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि १९७२ मध्ये म्युनिक ऑलिंपिकमध्ये ब्लॅक सप्टेंबर या संघटनेद्वारे ११ इस्त्रायली खेळाडूंच्या हत्येची आठवण ताजी केली. पाकिस्तानातील आजचा हल्ला म्हणजे पाकिस्तानचे तालिबानीस्तान वेगाने होत असल्याचा ढळढळीत पुरावा आहे. आता पाकिस्तानची वाटचाल अफगाणिस्तानच्या मार्गावर होते की काय ही भीती दाटून आली आहे.

खेळाडूंना ओलिस ठेवण्याचा इरादा
जवळपास दहा ते बारा अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याची सुरवातीची माहिती आहे. हे लोक पांढर्‍या कारमधून आले होते, असेही कळते. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रांसह सुकामेवा व इतर बरेच काही सामान घटनास्थळी सापडले. याशिवाय त्यांच्याकडे मोठा दारूगोळा होता. शिवाय रॉकेट लॉंचरसारखी अत्याधुनिक शस्त्रेही होती. पण पोलिसांच्या प्रतिकारामुळे त्यांना जास्त काळ थांबता आले नाही. अन्यथा त्यांना या खेळाडूंना ओलिस ठेवायचे होते, असे या वस्तूंवरून दिसून येते. मात्र, यापैकी एकालाही पोलिसांना पकडता आलेले नाही. भर शहरातून हे अतिरेकी हल्ला करून पळून जात असतील तर या शहराची सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ असेल हे कळून येते. मुंबईत निदान या अतिरेक्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश तरी आले आणि त्यातल्या कसाबला तर मुंबई पोलिसांनी तो पळून जात असतानाच पकडले. मात्र, पाकिस्तानात हे सगळे अतिरेकी व्यवस्थित पळून गेले. संशयित म्हणून पोलिसांनी चार टाळकी तेवढी ताब्यात घेतली. पाकिस्तानच्या पोलिसांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी ही घटना आहे.

हल्ल्यामागे तालिबान
या हल्ल्यामागे कोण असावे याविषयी अजूनही काही स्पष्ट झालेले नाही. पण प्रामुख्याने अल कायदा, तालिबान हे असावेत असा प्राथमिक निष्कर्ष व्यक्त होतो आहे. कारण लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिदीन यासारख्या भारतविरोधी दहशतवादी संघटना आश्रयदात्या पाकिस्तानातच दुसर्‍या देशाच्या नागरिकांवर हल्ला चढवून आपल्याच पायावर कुर्‍हाड मारतील असे वाटत नाही. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानचा घास घ्यायला बसलेले तालिबानींच हे कृत्य घडविले असण्याची शक्यता आहे. तहरीक ए तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे एका भारतीय वृत्तवाहिनीला सांगितल्याचेव वृत्त आल्याने या तर्काला पुष्टीच मिळते आहे. हे अतिरेकी प्रशिक्षित होते आणि या हल्ल्याचा संबंध पंजाब प्रांताच्या गव्हर्नर सलमान तासीर यांनी जोडला आहे. त्यात काही तथ्य असावे असेही दिसते आहे.

हल्ल्यामागचा हेतू
पाकिस्तानमधील असुरक्षित परिस्थितीमुळेच कोणताही संघ तिथे यायला तयार नव्हता. भारतानेही तिथे होणारी चॅंपियन करंडक स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोट्याच्या गाळात रूतत होते. त्यांना मदतीचा हात द्यावा या भावनेनेच श्रीलंकेचा संघ पाकिस्तानात गेला होता. पण दुर्देवाने याच संघावर हल्ला करून दहशतवाद्यांनी उरलेसुरले पाकिस्तानी क्रिकेटही संपवून टाकले. यानंतर कोणताही संघ पाकमध्ये क्रिकेट खेळायला जाईल याची सुतराम शक्यता नाही. श्रीलंका या 'थर्ड पार्टी' देशाला लक्ष्य करून आम्ही कुणापर्यंतही पोहोचू शकतो हे दहशतवाद्यांना दाखवून द्यायचे असावे. शिवाय तालिबानचा मनोरंजनाच्या कोणत्याही प्रकाराला विरोध आहे. म्हणूनच अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आल्या आल्या तालिबानींनी फुटबॉल खेळण्यावर बंदी घातली होती. पाकिस्तानच्या तालिबान प्रभावित भागातही हीच स्थिती आहे. आपली ही भूमिका त्यांनी लाहोरच्या हल्ल्यामार्फत तमाम पाकिस्तानी लोकांपर्यंत पोहोचवली असावी.

पाकिस्तानचा घास घेण्यासाठी तालिबानी टपलेले आहेत. २००७ मध्ये अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या भागात सक्रीय असेलल्या तालिबानींच्या सात अतिरेकी संघटनांशी करार करून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी तो भाग तालिबानींच्या हाती स्वतःहून दिला होता. विद्यमान राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारींनी स्वात खोरे तालिबानींच्या नावे केले आहे. आता तालिबानी उर्वरित पाकिस्तानकडे वळले आहेत. त्यांनी इस्लामाबादच्या दारावर धडका द्यायला सुरवात केली आहे. इस्लामाबादमधील अनेक भिंती तालिबानचे समर्थन करणारा मजकूर वागवत आहेत आणि त्या पुसण्यासाठी पाकच्या प्रशासकीय यंत्रणेच्या नाकी नऊ येत आहेत. याशिवाय वायव्य सरहद्द प्रांतातही पेशावरपासून सर्वत्र तालिबानींचा मुक्त वावर आहे. तिकडे वझिरीस्तान आणि बलुचिस्तान इथे तर अघोषित तालिबानी राज्य आहे. सिंध आणि पंजाबमध्ये बाकीच्या अतिरेकी संघटनांचा धुमाकूळ सुरूच असतो. कराचीच्या परिसरातली तालिबानी लपून बसले आहेत. त्यांना हे शहर ताब्यात घ्यायचे आहे, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच एका वृत्तपत्राने दिले होते. पाकव्याप्त काश्मीर तर अतिरेक्यांचा अड्डाच आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरक्षित कोणता भाग आहे असा प्रश्न पडतो.

तालिबानींच्या इस्लामी नेत्यांना धमक्या
इस्लामाबादेतल्या अनेक धार्मिक नेत्यांनाही सध्या तालिबानकडून धमक्या मिळत आहेत. एक तर पाकिस्तानात राहून आम्हाला पाठिंबा द्या किंवा देश सोडून चालते व्हा असे दोन पर्याय त्यांना दिले जात आहेत. तालिबान विरोधक म्हणजे अमेरिकेचे हस्तक किंवा सरकारी 'प्रतिनिधी' अशी तालिबानची व्याख्या आहे. त्यामुळे त्यांना हे धार्मिक नेतेही नकोसे झाले आहेत. तालिबानच्या धमक्या फक्त धार्मिक नेत्यांनाच आहे असे नाही, तर भारतविरोधी काम करणार्‍या अनेक दहशतवादी गटांनाही आहेत. या संघटना पाकिस्तानी सरकारची मदत घेऊन भारतात दहशतवादी कारवाया करतात हे उघड आहे. पण पाकिस्तानलाही अमेरिकेकडून कोणत्या ना कोणत्या रूपात मदत मिळते हेही सत्य आहे. हेच त्यांना नको आहे, शिवाय आगामी काळात या संघटनांना त्यांना सत्तेत भागिदारही करायचे नाहीये.

राजकीय अनागोंदी
अशी भयावह स्थिती असताना निदान राजकीय पातळीवर तरी सामंजस्याचे वातावरण असावे तर तेही नाही. राष्ट्राध्यक्ष झरदारींना कुणीही जुमानत नाही आणि झरदारी कुणाला विश्वासात घेऊन कारभार करत नाही. आता न्याययंत्रणेला ताब्यात घेऊन त्यांनी शरीफ बंधूंची निवड रद्द ठरवली आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदावरून नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज यांना घालवले. त्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष धुमसतो आहे. त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांमध्येही एकवाक्यता नाही. मुंबई हल्ल्यासंदर्भात प्रत्येक मंत्री वेगळे विधान करत होता. लष्करी अधिकारीही त्याचीच री ओढत आहेत. मुंबई हल्ल्याप्रकरणी नौदलप्रमुख भलताच तर्क लढवतात आणि मग नंतर खुलासे करत बसतात. एकूणात सगळीकडे अनागोंदी आहे.

भारतासाठी धोका
या पार्श्वभूमीवर तालिबानींचे फावले नसते तरच नवल. आता त्यांनी देशाचा ताबा घ्यायला सुरवात केली आहे. स्वातपासून इस्लामाबदचे अंतर जेमतेम १६० किलोमीटर आहे. त्यामुळे हे अंतर ते अपेक्षेपेक्षाही कमी वेळात कापणार अशी शक्यता दिसते आहे. शिवाय राजकीय अनागोंदीही त्यांना पुरक ठरते आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी मात्र परिस्थिती कठीण आहे. भारतात नुकताच मुंबईवरील हल्ला झाल्यानंतरही परिस्थिती काही फारशी सुधारलेली नाही. आता भारतात पैशांची उधळण झालेल्या 'आयपीएल'च्या स्पर्धा होऊ घातल्या आहेत. या स्पर्धांत असे कोणतेही हल्ले होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंवर हल्ला होईल असा विचारही कधी केला गेला नव्हता. पण आता तोही विचार करून या स्पर्धा अतिशय सुरक्षित वातावरणात घ्याव्या लागतील.
नकार