Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

वाजपेयी, अडवानी आणि आता मोदी (१)

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अशी सध्या भाजपची अवस्था झाली आहे. निवडणुकीनंतर कोणत्या आघाडीला बहूमत मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाजपेयींमध्ये मात्र पुढच्या पाच वर्षानंतरच्या पंतप्रधानपदासाठीचे 'बुकींग' सुरू आहे. या पाच वर्षाचा प्रश्न अडवानींनी स्वतःचे नाव बुक करून आणि ते इतरांच्या तोंडून वदवून घेत सोडवला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत अडवानी निवृत्त होतील, अशी अपेक्षा धरून बाकीच्यांच्या नावाचे बुकींग सुरू झाले आहे. यात अर्थातच आघाडीवर आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी.

वाजपेयी. अडवानी आणि आता मोदी. भाजपचा प्रवास अधिक कडवेपणाकडे चालला आहे, याचे हे लक्षण. वाजपेयी आणि अडवानी हे संघ परिवारातून आले असले तरी वाजपेयींची प्रतिमा मवाळ होती. पण वाजपेयींना पुढे केल्यामुळे पक्षाला एक चेहरा मिळाला. विचारसरणीच्या आधारे देशात सत्ता येऊ शकत नाही. त्यासाठी करिश्मा असणारा नेता लागतो, असा गेल्या काही वर्षांचा ट्रेंड आहे. कॉंग्रेसवर गांधी घराण्याचा 'हात' आहे. तर भाजपच्या भाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा टिळा होता. पण संघाच्या विचारसरणीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत. म्हणूनच संघ आणि राजकारण यांचे मिश्रण असलेले वाजपेयी भाजपला लाभले. भाजपला सत्तेत येण्याची संधी आघाडीच्या मार्फत का होईना मिळाली ती केवळ वाजपेयींमुळे. त्यांच्या उदारमतवादी चेहर्‍याकडे पाहून लोकांनी मते दिली आणि आघाडीचे घटकपक्ष भाजपच्या हिंदूत्ववादी भूमिकेशी फारकत घेणारे असले तरीही वाजपेयींमुळे एनडीएच्या झेंड्याखाली एकत्र आले.

अडवानींना पुढे करून भाजपने त्यावेळी निवडणूक लढली असती तर ती जिंकली असती का? नक्कीच नाही. हिंदू मनांना चेतवून बाबरी मशीद जमीनदोस्त करूनही अडवानींची लोकप्रियता काही वाढली नाही. पण भाजपचा एक प्रमुख आक्रमक नेता आणि पक्षाचा कडवा हिंदूत्ववादी चेहरा ही प्रतिमा मात्र नक्कीच प्रस्थापित झाली. पक्षातही दोन गट स्पष्टपणे पडले. पण वाजपेयींची जनमानसातील प्रतिमा एवढी उंच होती, की अडवानी त्यापुढे नेहमीच खुजे ठरले. अडवानींची जनमानसावर नसली तरी पक्षावर मोठी पकड होती. ते सांगतील तो अध्यक्ष आणि सरचिटणीस असतो. म्हणूनच बंगारू लक्ष्मणपासून वेंकय्या नायडू ते अगदी राजनाथसिंहपर्यंतची 'चेहरेविहीन' मंडळी पक्षाचे अध्यक्ष बनू शकली. या चेहर्‍यांमागचा खरा चेहरा अडवानीच राहिले.

भाजपचा जनमानसातील चेहरा म्हणून 'प्रमोट' होण्याची त्यांची इच्छा निदान वाजपेयींच्या सक्रीय उपस्थितीत तरी पूर्ण होऊ शकली नाही. म्हणूनच वाजपेयींनी शारीरिक अस्वास्थ्यामुळे सक्रीय राजकारणातून माघार घेणे सुरू केले तेव्हा अडवानींच्या मनातली पंतप्रधानपदाची इच्छा डोके वर काढू लागली. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी त्यांना पेन्शनीत काढण्याचे प्रयत्नही सुरू झाले होते. अडवानींनी गृहमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांनी थेट उपपंतप्रधानपदही (जे घटनेत अस्तित्वातच नाही) हाती घेतले.

पुढे वाजपेयींनी स्वतःहूनच थांबायचा निर्णय घेतल्यानंतर अडवानींच्या पंतप्रधानपदाच्या इच्छेला नवे पंख फुटले. पण जिना प्रकरण भोवल्याने त्यांच्या मार्गात बरेच अडथळे होते. अखेर संघापुढे लोटांगण घातल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण झाले. आता त्यांना आस लागली ती पंतप्रधानपदाची. पक्षावर त्यांचे वर्चस्व होतेच. त्यामुळे या पातळीवरही त्यांनी 'पंतप्रधान मीच' असे इतरांच्या तोंडून वदवून घेतले. प्रश्न आघाडीतल्या मंडळींचा होता. तोपर्यंत पेन्शनीत निघालेल्या जॉर्ज फर्नांडीसांना बाजूला सारून त्यांनी शरद यादवांना कनवटीला बांधले आणि त्यांना एनडीएचा निमंत्रक केले. त्यांच्याकरवी आघाडीचेही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वतःच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आणि अखेरीस ते 'पीएम इन वेटींग' बनले.
नकार