Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

जाती-पातीचं 'राज'कारण

छत्रपती शिवरायांनी राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून 'स्वराज्य' स्थापन केले होते, आता त्याच छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निमित्ताने राज्यात तो 'जातीय' गोंधळ घातला जातोय तो निषेधार्ह आहे. या स्मारकाच्या समितीत शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचा समावेश करण्यावरून आणि नंतर त्यांना अध्यक्षपदी बसविण्याच्या कथित प्रयत्नांवरून मराठा संघटनांच्या नेत्यांनी जो 'हाय तौबा' माजवलाय तो अनाकलनीय आहे. त्यात राज ठाकरेंनी या वादात पुरंदरेंच्या बाजूने उडी घेतल्यानंतर तर 'मराठेतरांचे' पुढारी असलेल्या प्रबोधनकार ठाकरेंच्या या नातवाला 'ब्राह्मणवादी' ठरविण्यापर्यंत काहींची मजल गेली. म्हणूनच या वादाला जातीय संघर्षाचे कडवे स्वरूप येण्याआधीच खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वजातीय मराठा नेत्यांना फटकारत शिवाजी महाराज त्यांची खासगी मालमत्ता नसल्याचे सांगितले ते बरे केले. त्याचवेळी भाजपचे मराठा नेते विनोद तावडे व मधु चव्हाण या नेत्यांनीही या वादात पुरंदरेंची बाजू घेतली त्यामुळेही पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला जातीयवादाचा बट्टा धुसर तरी झाला.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाविषयी, त्यांनी लेखन करताना घेतलेल्या भूमिकेविषयी मतभेद असू शकतात. पण गेली कित्येक दशके हा माणूस शिवचरित्र लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या ध्यासाने धडपडतो आहे. त्यात नित्यनूतन संशोधन करतो आहे. हे चरित्र लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी लिहितो आहे नि जाणता राजाच्या माध्यमातून आपल्या या राजाला जगभरात पोहोचवतो आहे. पण हे दिसत नसलेल्यांना कुठल्या तरी द्वेषाच्या काविळीचीच बाधा झाली आहे, हे निःसंशयपणे म्हणता येईल. (खरं तर हा द्वेष कुठला हेही सांगण्याची गरज नाही!) शिवरायांच्या चरित्रात त्यांचे गुरू कोण हा प्रश्न जणू शिवरायांची उंची किती हे ठरविणारा झाला आहे. त्यांचे गुरू दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी होते की त्याहून कुणी वेगळे यावर महाराजांची उंची ठरविणारे स्वतः किती खुज्या विचारांचे आहेत, हेच या निमित्ताने दिसून येते आहे. महाराजांनी अफाट कर्तृत्वाद्वारे गुलामगिरीत अडकलेल्या मराठी मनांत स्वाभिमानाचा श्वास फुंकला हे महत्त्वाचं की महाराजांना हा श्वास फुंकण्यासाठी लागणारा 'वारा' लहानपणी त्यांच्यात कुणी ओतला याचा शोध घेणं महत्त्वाचं? महाराजांचे गुरू कुणीही असले आणि नसले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरीशंकर तमाम मराठीजनांसाठी तितकांच उत्तुंग राहिल यात काही शंका नाही. पण तरीही काही मंडळी गुरू हा विषय घालून वाद घालत त्याला जी जातीय किनार देत आहेत, ते पाहता पूर्वीच्या ब्राह्मण्यवादी मानसिकतेच्याच मंडळींची ही मंडळीही बरोबरी करत आहेत, असे वाटते.

शिवाजी महाराजांना जातीय कुंपणात अडकवून ठेवण्याचा संभाजी ब्रिगेडसह इतर काही मराठा समाजाच्या संघटनांचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून चालला आहे, तो हाणून पाडला पाहिजे. संशोधनाचा मानदंड प्रस्थापित करणार्‍या पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये येऊन गेल्यानंतर कुण्या फिरंगी जेम्स लेनने विकृत विचारांचे गरळ त्याच्या पुस्तकात ओकले, म्हणून या संस्थेवरच हल्ला चढविणार्‍यांची बौद्धिक पातळी काय असावे हे लक्षात येते. स्वतः छत्रपतींनी कधी जात पाळली नाही. सर्व जाती-पातीच्या इतकेच नव्हे तर धर्माच्या लोकांना जवळ करून त्यांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. हे स्वप्न साकारताना महत्त्व कर्तृत्वाला दिले, जातीला नाही. म्हणूनच विविध जाती-पातीतल्या मावळ्यांचा 'गोतावळा' त्यांच्याभोवती जमला. पण हल्ली या उपरोल्लिखत काही संघटना जणू महाराज आपली 'प्रायव्हेट प्रॉपर्टी' असल्याच्या थाटात वावरत आहेत. जणू या विषयावर बोलण्याचा, लिहिण्याचा नि काहीही करण्याचा परवाना आपल्याकडेच असावा असे वागत आहेत. दुसरे कुणी यावर काहीही करायेच झाल्यास यांना विचारून ते करावे अशी त्यांची अपेक्षा असते. हा तर समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न आहे.

पण या वादाला विखारी जातीय वळण लागत असतानाच मुख्यमंत्र्यांना संबंधितांना फटकारले ते योग्य केले. हे स्मारक जगभरात देखणे ठरावे यासाठी समिती स्थापन केली जाणे गरजेचे आहे. याच्या अध्यक्षपदी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्रीच असतात. त्यात सदस्य कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, याचा निर्णयही सर्वस्वी त्यांचाच असतो. त्यामुळे मला सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये हे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले ते बरेच झाले. त्यात पवारांचेही विधान आल्याने त्यांच्या विधानालाही बळ मिळाले. भाजपनेही योग्य पाठराखण केली. आता या समितीत पुरंदरेंसह, आ. ह. साळुंखेंसह इतरही इतिहासकारांना घ्यायलाही काही हरकत नाही. इतिहासाच्या दृष्टीविषयी त्यांच्यात भलेही मतभेद असतील, पण त्यातून निघालेल्या चर्चेतून नक्कीच चांगलेच स्मारक साकारेल यात काही शंका नाही.

तूर्तास, छत्रपतींच्या कुळाचा अभिमान बाळगून त्यांच्यावर दावा सांगणार्‍यांना मिळालेली चपराक महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे हे नक्की!
नकार